नवी दिल्ली | 15 सप्टेंबर 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ सप्टेंबरला आपला ७५ वा वाढदिवस साजरा करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मोदींबाबत महत्त्वाचा गौप्यस्फोट केला आहे. “मोदींच्या सर्वात जवळची व्यक्ती कोण?” या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सर्वसामान्यांचा गैरसमज दूर केला.
इराणी म्हणाल्या, “जर कोणी स्वतःला पंतप्रधान मोदींचा निकटवर्तीय म्हणवत असेल, तर एकतर तो व्यक्ती त्यांना ओळखत नाही किंवा तो खोटं बोलतो.” त्यांच्यानुसार, मोदींच्या आयुष्यात अशी एकही व्यक्ती नाही जी त्यांच्या सर्वात जवळ आहे. मोदींनी एक मोठा उद्देश डोळ्यासमोर ठेवून घर सोडलं असून, त्यांच्या सोबत काम करणाऱ्या लोकांकडे क्षमता आणि ऊर्जा असली, तरच ते त्यांना महत्त्व देतात.
मोदींच्या कार्यशैलीवर प्रकाश
स्मृती इराणी यांनी मोदींच्या काम करण्याच्या पद्धतीचे विशेष कौतुक केले. त्या म्हणाल्या, “मोदींच्या डोक्यात प्रचंड स्पष्टता आहे. माझ्याकडे एकच आयुष्य आहे आणि ते मी माझ्या देशासाठी समर्पित करणार आहे, ही भावना त्यांच्यात ठाम आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, मोदी काटेकोरपणे काम कसे करायचे, हे लोकांना शिकवतात. त्यांची स्मरणशक्ती विलक्षण आहे. २००७ मध्ये एखाद्या व्यक्तीने काय बोलले होते किंवा कोणत्या मुद्द्यावर काय मत मांडले होते, हे आजही मोदींना आठवते.
स्मृती इराणींचा राजकीय प्रवास
२०१९ मध्ये अमेठीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पराभव करून स्मृती इराणी चर्चेत आल्या होत्या. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसच्या किशोरीलाल शर्मा यांनी त्यांना पराभूत केले. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून काम केले. त्यानंतर टेक्सटाईल मंत्रालय आणि नंतर महिला व बालकल्याण मंत्रालयाची जबाबदारी त्यांनी सांभाळली.
आज ते सक्रिय राजकारणापासून काही प्रमाणात दूर असल्या तरी मोदींविषयी केलेलं त्यांचं हे विधान पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
स्मृती इराणींच्या विधानातून हे स्पष्ट झाले की, पंतप्रधान मोदींच्या जवळ कोणीही नाही, ते फक्त राष्ट्राच्या उद्दिष्टांसाठी समर्पित आहेत. मोदींच्या कार्यशैली, कठोर निर्णयक्षमता आणि स्पष्ट दृष्टीकोनामुळेच ते इतरांपासून वेगळे ठरतात.