जैन बोर्डिंग प्रकरणातून शिंदेसेनेचा राजकीय डाव! मोहोळ अडचणीत!

पुण्यातील जैन बोर्डिंग डील रद्द झाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. शिंदेसेनेचे महानगरप्रमुख रविंद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केल्याने या प्रकरणाने जोर पकडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मूक पाठिंब्याने धंगेकरांनी हे प्रकरण उचलून धरल्याचं बोललं जात आहे.

मोहोळांवरचे आरोप अशा वेळेस झाले, जेव्हा पुणे महानगरपालिकेची निवडणूक जवळ येत आहे. मोहोळ हे पुण्यात भाजपचे प्रमुख नेते असून महापालिकेच्या निर्णयांमध्ये त्यांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे या आरोपांमुळे भाजपला पुण्यात राजकीय धक्का बसला आहे.

धंगेकरांचा आक्रमक डाव

धंगेकरांनी सोशल मीडियावर दररोज पोस्ट करून मोहोळांवर निशाणा साधला. त्यांच्या प्रत्येक विधानामुळे चर्चेचा विषय निर्माण झाला. साधा पदाधिकारी असूनही त्यांनी केंद्रीय मंत्र्यावर थेट आरोप केल्याने शिंदेसेनेची राजकीय ताकद अधोरेखित झाली.

ठाण्यात भाजप नेते गणेश नाईक यांनी शिंदेंवर हल्ले चढवले होते. त्याचेच “उट्टे” शिंदेसेनेने पुण्यात घेतले. भाजपच्या नेत्यांवर आरोप करून शिंदेंनी अप्रत्यक्षपणे सांगितलं की — “जर आमच्यावर टीका कराल, तर आम्हीही तुमच्या नेत्यांना सोडणार नाही.”

शिंदेंचा डाव आणि राजकीय संदेश

या प्रकरणातून शिंदेंनी स्पष्ट संदेश दिला आहे की, ते केवळ ठाण्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात आपली राजकीय पकड दाखवू शकतात. मोहोळांसारख्या केंद्रीय मंत्र्यांवर आरोप होणं हे शिंदेसेनेचं शक्तीप्रदर्शन मानलं जातं.

भाजपचा आश्वासक चेहरा डॅमेज

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला राज्यात मर्यादित यश मिळालं. मोहोळांना अमित शहांच्या सहकार खात्यात राज्यमंत्रिपद मिळालं होतं, आणि त्यांना भविष्यातील मराठा चेहरा म्हणून पाहिलं जात होतं. पण जैन बोर्डिंग प्रकरणानंतर त्यांची प्रतिमा डागाळली, आणि शिंदेसेनेचा हा डाव यशस्वी ठरला.

भावी राजकारणात मोहोळ अडचणीत

मोहोळ यांचं नाव भविष्यात मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होतं, पण या प्रकरणानंतर त्यांच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. शिंदेसेनेनं त्यांना अडचणीत आणत आपली राजकीय चतुराई पुन्हा सिद्ध केली आहे

जैन बोर्डिंग प्रकरण हे फक्त एक स्थानिक विषय नाही, तर महाराष्ट्रातील सत्ता समीकरणातला नवा अध्याय आहे. शिंदेसेनेने या प्रकरणातून भाजपला थेट संदेश दिला आहे की, “आम्ही फक्त साथी नाही, तर परिस्थितीनुसार प्रतिस्पर्धीही होऊ शकतो.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top